धाराशिव :जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतरही समाज संघटनांनी बंदची हाक दिली आहे. त्यास जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. एसटीही आगारातच थांबून आहेत.
धाराशिव येथील व्यापारी महासंघाने बंद समर्थन दिले आहे. यामुळे सकाळपासूनच अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यासोबतच कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करुन सरकारचा निषेध करण्यात आला. भूम शहरात व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. ईट येथील आठवडी बाजारही गुंडाळण्यात आला. तेर गाव बंद ठेवून नागरिकांनी सरकारचा निषेध केला आहे. लोहारा व उमरगा तालुक्यातही बंदचे पडसाद उमटले आहेत.
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. पारगाव, ईटकूर, बलसूर गावांतही बंद पाळण्यात आला आहे. एरवी गजबजलेला असणारा सोलापूर-धुळे महामार्गावर तुरळक वाहने धावताना दिसून आली. तुळजापूर तीर्थक्षेत्रीही बंदचे पडसाद दिसून येत असून, भाविकांची संख्या तुरळक आहे. जिल्हाभरातील एसटी सेवा तात्पुरती थांबविण्यात आली आहे.