कळंब : लातूर-कळंब या हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत करण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून कंत्राटदाराची यंत्रणा गायब झाली आहे. यामुळे मागच्या काही दिवसांपासून अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. दररोज एवढ्या संतापजनक स्थितीला तोंड द्यावे लागत असतानाही बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.
लातूर-कळंब या राज्यमार्गाची मागच्या तीन वर्षांपूर्वी दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच रस्त्यावर तालुक्यातील सर्वात मोठे गाव शिराढोण येते. याशिवाय राज्यातील प्रमुख असा ‘नॅचरल उद्योग’ समूह याच रस्त्यावर येतो. लगतच्या मुरुड, अंबेजोगाई व लातूर यांना ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास हा रस्ता मोठा मदतगार ठरतो. यानुसार, बांधकाम विभागाच्या हायब्रिड ॲन्युटी धोरणांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी जवळपास शंभर कोटी रुपयांचा ठेका एका औरंगाबादस्थित कंपनीला देण्यात आला. यानंतर, डिकसळ ते रांजणी इथपर्यंतच्या कळंब तालुका हद्दीतील कामास जोरात सुरुवातही झाली. मात्र, कंपनीच्या रखडपट्टीमुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे मागच्या दोन वर्षांपासून रस्त्याचा होत असलेला ‘विकास’ केवळ बांधकाम खाते, संबंधित ठेकेदार व या सर्वांवर परजीवी वनस्पतीप्रमाणे पोसली जात असलेल्या त्रयस्थ एजन्सीच्या बेफिकीरपणामुळे जीवावर उठला आहे. जवळपास दहा किलोमीटर लांबीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काही ठिकाणी एका बाजूचे काम केले आहे, तर काही ठिकाणी दोन्ही बाजू खोदून अर्धवट अवस्थेत काम ठेवले आहे. यामुळे पावसाने हा संपूर्ण भाग चिखलमय झाला आहे. यात वाहनांना अपघात होत आहे, दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत.
चौकट...
काम अर्धवट : गुत्तेदाराची यंत्रणा गायब...
लातूर-कळंब या राज्यमार्गाचे हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत सुधारणा होत असल्याने, या भागातील नागरिक खूश झाले होते. मात्र, मुदत संपली, तरी काम पूर्ण झालेले नाही. यातच लोहटा (पूर्व) ते डिकसळ या दरम्यानचे काम मागच्या दीड महिन्यापासून बंद आहे. या ठिकाणचे पोटगुत्तेदार गायब आहेत. खोदकाम, भराई व दबाई ठप्प आहे. जवळपास यंत्रणा कोठेच दिसून येत नाही. यामुळे या रस्त्याचा नित्य संबंध येणाऱ्या शिराढोण, लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, कोथळा, रांजणी, नायगाव, पाडोळी, घारगाव, हिंगणगाव, आवाड शिरपुरा, ताडगाव आदी गावांतील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बांधकाम विभागाचे ‘नरो वा कुंजरो’
दरम्यान, कामाचा दर्जा, केलेली खोदाई, त्यात भरलेला मुरुम, त्याची केलेली दबाई, त्यावर केलेले डांबरीकरण हे ‘क्वॉलिटी’चे मुद्दे तर दूरच. मात्र, साधी कामाची गती व स्थितीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ‘अपडेट’ नाही. या संदर्भात काम किती रकमेचे आहे, कालमर्यादा किती, का बंद आहे, याची विचारणा मागच्या पंधरा दिवसांपासून उपविभागीय अभियंता वायकर यांना केली होती. त्यांनी एका कनिष्ठ अभियंत्याकडे बोट दाखविले. त्या अभियंत्यांनी मलाही माहीत नाही, असे सांगितले. आपल्या ताब्यातील राज्यमार्गाचा विकास कसा व कोण करतोय, याची माहिती खुद्द बांधकाम विभागाला नसेल, तर त्या कामावर देखरेख करणाऱ्या त्रयस्थ एजन्सीचे काम किती चोख असेल, याचा विचार न केलेला बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लोक पडत आहेत, तरी लोकप्रतिनिधी गप्प
या भागातील चार जिल्हा परिषद सदस्य, आठ पं.स. सदस्य, विसेक गावचे सरपंच या रस्त्याशी संबंधित आहेत. या स्थितीत लोक पडत आहेत, त्यांची वाहने घसरगुंडीने अपघाताला तोंड देत आहेत, अनेकांना जखमी व्हावे लागले आहे, तरी उपरोक्त लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.
प्रतिक्रिया
चार महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. रस्ता जेसीबीने खोदून ठेवला आहे. दबाई व्यवस्थित केली नाही. आम्हाला रोज कळंबला जाताना-येताना त्रास होत आहे. गुत्तेदाराला बोललो, तर ते पैसे नसल्याने काम बंद असल्याचे सांगतात. पावसामध्ये दुचाकीवर ये-जा करणारे अनेक जण घसरून पडत आहेत. त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. गुत्तेदाराने एक बाजू तरी पूर्ण करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर जर काम पूर्ण नाही केले, तर आम्ही करंजकल्ला गावातील गावकरी रस्ता रोको आंदोलन करून संबंधित गुतेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करू.
- विशाल पवार, सरपंच, करंजकल्ला