लोहारा : रेडी... स्माईल प्लिज... म्हणत विविध कार्यक्रम व विवाह सोहळ्यातील कुटुंबाच्या सुखद क्षणाच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारे फोटोग्राफर्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे तसेच इतर कार्यक्रमाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेकडो फोटोग्राफर्सची यंदाची कमाई बुडाली. परिणामी आर्थिक अडचणींत जास्तीची भर पडली आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले हाेते. परंतु, ही लाट सरते ना सरते ताेच दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची असल्याने शासनाने ब्रेक द चेन ही माेहीम हाती घेत निर्बंध पुन्हा कठाेर केले. त्यामुळे विशेषता मार्च, एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हाेणारे विवाह तसेच अन्य समारंभावर टाच आली. दरम्यान, या कालावधीतील साेहळ्यांच्या अनेक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना ऑर्डरही हाेत्या. मात्र, साेहळेच रद्द झाल्याने आपाेआप ऑर्डरही रद्द झाल्या. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांची वर्षभराची कमाई बुडाली. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे हेच एकमेव साधन असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फाेटाेग्राफर साेबतच फोटो - व्हिडिओ ॲक्सेसरीज विक्रेते, कलर लॅब यांच्याही व्यवसायाला माेठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक फाेटाेग्राफर सध्या मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.
काेट...
दोन वर्षांपासून फोटोग्राफर व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. यामुळे दुकान भाडे, कामगारांचा पगार द्यायच्या की कुटुंब सांभाळायचे, हा प्रश्न आमच्यासमाेर उभा ठाकला आहे.
-चंद्रकांत फावडे, फोटोग्राफर, लोहारा
साधारणपणे २०२० पासून फोटोग्राफर व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आमची कमाई मार्च ते मे महिन्याच्या लग्नसराईत असते. मात्र, कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे व्यवसाय बंद आहे. परिणामी काय करावे सुचत नाही.
-रवी नरुणे, फोटोग्राफर, लोहारा
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमचा रोजगार बंद झाला. दुकानामुळे रोजीरोटीचा प्रश्न मिटत होता. पण ते ही बंद ठेवावे लागत आहे. शासनाने इतर व्यावसायिकांना जशी मदत केली, तशी मदत फोटोग्राफरलाही करावी.
-उमर शेख ,फोटोग्राफर, खेड
कोरोनामुळे दोन वर्षांपासून माेठ्या समारंभांना मर्यादा आल्या आहेत. हे कार्यक्रम झाले तरी छाेटेखानी हाेतात. त्यामुळे आम्हाला काम मिळत नाही. त्यामुळे शेतातील मजूर बंद करून स्वत: काम सुरू केले आहे.
-सदाशिव जाधव, फोटोग्राफर, माकणी