अणदूर : कोरोना महामारी काळात विविध घटकांसोबतच मत्स्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने मत्स्य व्यावसायिकांचा सर्व्हे करून त्यांना शासकीय आर्थिक मदत करावी, अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) येथील अभिमान कोळी या मत्स्य व्यावसायिकाने केली आहे.
अभिमान कोळी हे स्वत: मागील चाळीस वर्षांपासून मत्स व्यवसाय करीत आहेत. त्यांना उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नाही. यामुळे नांदुरी, आरळी, चिवरी, देवसिंगा, उमरगा (चि) येथे ते नियमित मासेमारी करून, आपले कुटुंब चालवितात. या व्यवसायातून त्यांनी आपल्या चार मुलींचे व एका मुलाचे लग्न पार पाडले, शिवाय उसनवारीने पैसे काढून या व्यवसायासाठी जाळे, पाणबुडी, नाव असे तीन लाख रुपये यात गुंतविले. दरम्यान, गतवर्षी अतिवृष्टीमुळे उमरगा येथील तलावातील लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. यातून शिल्लक माशांना बाजारपेठ मिळाली नसल्याने, तसेच कोरोनामुळे गावोगावी फिरून मत्स विक्री करण्यास कोरोनामुळे बंदी असल्याने, या दरम्यान त्यांना जवळपास तीन लाखांचा फटका बसला. त्यामुळे आता शासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.