उमरगा : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असला तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला इतर आजाराबद्दल शस्त्रक्रिया करावयाची असल्यास किमान दीड महिना वाट पाहावी लागते; परंतु या कालावधीत संबंधित रुग्णाचा आजार गंभीर अथवा जास्तीचा बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या या कालावधीबाबत अनेक संभ्रम असून, कोरोना रुग्णाला याबाबत जास्तीची माहिती नसल्याने कोरोना होऊन गेल्यानंतरही दीड महिन्याचा कालावधी कशासाठी, असा प्रश्न पडला आहे.
उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर आजपर्यंत कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसली तरी इमर्जन्सी शस्त्रक्रिया करण्याबाबत नियोजन आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्ण तयारी ठेवली गेली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावयाची असल्यास संबंधित कोरोना रुग्णासह शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या पथकांना पीपीई किट, हँडग्लोज वापरणे सक्तीचे आहे. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवणे, त्याच बरोबर शस्त्रक्रिया केलेली सर्व साहित्य नष्ट करणे व शस्त्रक्रिया कक्षाचे निर्जंतुकीकरण करून २४ तास तेथे प्रवेश निषिद्ध केला जातो.
प्लान शस्त्रक्रिया
कोरोना झालेल्या रुग्णावर इतर आजाराबद्दल शस्त्रक्रिया करावयाची असल्यास कोरोना होऊन गेल्यानंतर किमान दीड महिना थांबावे लागते. तसे त्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी परत एकदा कोरोना चाचणी करूनच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो.
शस्त्रक्रियेसाठी दीड महिना वाट पाहा
कोरोना झाल्यानंतर दीड महिना शस्त्रक्रिया करता येत नाही; परंतु कित्येकांना कोरोना झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणे शक्य नाही. त्यातच शस्त्रक्रिया अत्यंत निकडीची असल्यास डॉक्टरांनी तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जातो. कोरोना होऊन गेल्यानंतर किती कालावधीनंतर शस्त्रक्रिया करायची, हे बहुतांश जणांना माहिती नसते. त्यामुळे ते खाजगी डॉक्टरांना कोरोना झाल्याची माहितीही देत नाहीत. यातून कोरोना संसर्ग व इतर अपायकारक गोष्टी होऊ शकतात. यामुळे कोरोना झाल्यानंतर दीड महिन्यानंतर शस्त्रक्रिया न करण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
कोट.......
कोरोना होऊन गेल्यानंतर कोरोना विषाणू शरीरातून पूर्णतः नष्ट होण्याचा कालावधी किमान १२ आठवड्यांपर्यंतचा आहे. त्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. इमर्जन्सी असेल तर सर्व खबरदारी घेऊनच शस्त्रक्रिया करतो. यात कोणताही हलगर्जीपणा केला जात नाही.
- डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उमरगा
कोरोनाचे एकूण रुग्ण 6302
बरे झालेले रुग्ण ५८८५
एकूण कोरोना बळी ४०३
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १३