उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने उंचावत चाललेला आहे. परिणामी, कोविडवर उपचार देणाऱ्या शासकीय, खासगी रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या ठरू लागल्या आहेत. संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील आणखी पाच खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित केली.
जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा आता चाळीस हजारांच्याही पुढे गेला आहे. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही एक हजाराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नियमित रुग्णसंख्या ही मोठी येत असून, तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या ठरू लागल्या आहेत. शिवाय, भविष्यातही अडचणी उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी जिल्ह्यातील पाच खासगी रुग्णालये कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आहेत. यामध्ये तुळजापूर येथील आशीर्वाद हॉस्पिटल व कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १० खाटा, उमरग्यातील नरवडे हॉस्पिटलमधील १०, परंडा येथील मोरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्वच ३० खाटा, तर उस्मानाबाद शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ४० खाटा वाढवून एकूण ६० खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश आहेत. या पाचही रुग्णालयांतून एकूण १२० खाटा उपलब्ध होतील.
सोनारीत भक्त निवासात सोय...
परंडा तालुक्यातील सोनारी येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या भक्त निवासात ५० बेडची सुविधा उपलब्ध करून घेत येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच भूम येथील आयटीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या सेंटरमध्ये ७५ बेड वाढवून तेथे १०० खाटांची सुविधा तयार करण्यात येणार आहे, तर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात नॉन कोविड कामे व लसीकरणासाठी इमारत अपुरी ठरत असल्याने येथील बालसंस्कार विद्यामंदिरची इमारत अधिग्रहित करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.