डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्ती नावाच्या डासांपासून होतो. डासांची उत्पत्ती साठवलेले स्वच्छ पाण्यात होत असते. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात. त्यामुळे वातावरण या डेंग्यूच्या डासांकरिता पोषक असते. म्हणूनच या दिवसांमध्ये डेंग्यूचा आजार बळावत असतो. यासोबतच निमोनिया, टायफॉईड आदी आजारांचे प्रमाणही जास्त असते. परंतु, गेल्या वर्षापासून कोरोनाचीच वातावरण निर्मिती झाल्याने सर्वत्र कोरोनाचेच गारुड आहे. परिणामी, या काळात डेंग्यू, न्यूमोनिया, टायफॉईड आदी आजाराचे रुग्ण आपोआपच कमी झाल्याचे चित्र आहे. सध्या आरोग्य यंत्रणाही इतर आजारांना विसरून केवळ कोरोनाच्या उपाययोजनावर लक्ष केंद्रित करून आहेत.
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपरोक्त आजाराच्या रुग्णाची कोरोना चाचणी करून त्याच्यांवर कोरोना आजारांचे उपचार सुरू होतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांच्या तोंडी कोरोना आजारच आहे. अशा रुग्णांना कोविड वाॅर्डात दाखल करून उपचार केले जात असल्याने त्याच्या मनामध्ये कोरोनाबाबत अनावश्यक भीती निर्माण होत आहे.
डेंग्यूची लक्षणे काय
अचानक तीव्र स्वरूपाचा ताप येणे.
तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी,
उलट्या होणे.
अशक्तपणा, भूक मंदावणे,
जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड येणे.
तापामध्ये चढ-उतार असणे
अंगावर पुरळ येणे
पोट दुखणे
अशी घ्यावी दक्षता
घरातील पाण्याची भांडी कोरडी करावी
पाण्याची भांडी व टाकी झाकून ठेवावी
कुलर रिकामे करून कोरडे करावे
संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत.
वेळीच डाॅक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा
कोट...
जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी नागरिकांमध्ये डासांपासून होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती केली जात असते. तसेच ज्या भागात रुग्ण आढळून येतात. त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जलद ताप सर्व्हे केला जातो. तसेच ॲबेटिंग केली जात असते. या वर्षी चार महिन्यात २ रुग्ण आढळून आले आहेत.
डॉ. एम.आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी
गेल्या पाच वर्षांतील डेंग्यू आजाराची स्थिती
वर्ष रुग्ण
२०१६ १३
२०१७ २
२०१८ १७
२०१९ ४८
२०२० १८५
२०२१ एप्रिलपर्यंत २