उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सजग नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी २२ केंद्रांवर कोविशिल्ड तर ९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करुन दिली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस घेता येईल.
तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी २२ केंद्रांवर कोविशिल्ड व ९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल. ४५ वर्षांपुढील नागरिकांना ऑन द स्पॉट लस मिळणार आहे.
या ठिकाणी मिळेल कोविशिल्ड
भूम, वाशी ग्रामीण रुग्णालय, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, कळंब तालुक्यातील येरमाळा, दहिफळ, मंगरुळ क, शिराढोण, इटकूर, मोहा, वाशी तालुक्यातील तेरखेडा, पारा, पारगाव, भूम तालुक्यातील ईट, पाथरुड, माणकेश्वर, वालवड, अंभी, परंडा तालुक्यातील शेळगाव, जळगाव नि.,अर्नाळा, आसू ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. अशा व्यक्तीस दुसरा डोस घेता येईल.
येथे मिळणार कोव्हॅक्सिन
लोहारा, मुरुम, सास्तूर, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, पोलीस हॉस्पिटल या केंद्रावर कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले आहेत. त्यांना दुसरा डोस मिळेल.