उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे; मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सजग नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी ११ केंद्रांवर कोविशिल्ड तर १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस घेता येईल.
जून महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे; मात्र काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी ११ केंद्रांवर कोविशिल्ड व १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल. ४५ वर्षांपुढील नागरिकांना ऑन द स्पॉट लस मिळणार आहे.
या ठिकाणी मिळेल कोव्हॅक्सिन
लोहारा, सास्तूर, मुरुम, वाशी,भूम, तेर ग्रामीण रुग्णालय, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली.
येथे मिळणार कोविशिल्ड
उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, कळंब येथील फुले, आंबेडकर वाचनालय, तुळजापूर येथील भीम नगर मंदिर सभागृह, परंडा येथील सिद्वीवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील भारत माता मंदिर, वाशी येथील शिवशक्ती नगरमधील जि.प.पा. शाळा, मुरुम येथील कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भूम येथील रवींद्र हायस्कूल, उस्मानाबाद येथील पोलीस हॉस्पिटल या केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध असेल.