तेर : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने तीव्र स्वरूप धारण केले आहे. दिवसागणिक सहाशे ते सातशे रुग्ण आढळून येत आहेत. दगावणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. याच काळात हाेम आयसाेलेशनचे प्रमाणही वाढले. परिणामी रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने भर पडत गेली. ही बाब लक्षात आल्यानंतर आता गावपातळीवर आयसाेलेशन सेंटर उभे करण्याचे लाेकप्रतिनिधी, तसेच प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले हाेते. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील माेठ्या नऊ गावांमध्ये लाेकसहभागातून विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत.
काेराेनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे दवाखान्यात बेड उपलब्ध हाेत नाहीत. परिणामी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना हाेम आयसाेलशेनमध्ये पाठविले जाते. परंतु, यातील अनेक मंडळी बाहेर फिरते. अशा प्रकाराला आळा बसावा, यासाठी खास करून माेठ्या गावांमध्ये आयसाेलेशन सेंटर सुरू करण्याचे आवाहन लाेकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून करण्यात आले हाेते. त्यानुसार ग्रामस्थांनी जबाबदारी घेत आजघडीला अस्मानाबाद तालुक्यातील तेर, बेंबळी, येडशी, ढोकी, करजखेडा, वरूडा, केशेगाव, पाडोळी (आ.) या गावांमध्ये ग्रामपंचायत व लोकसहभागातून शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तहसीलदार गणेश माळी यांनी स्वतंत्र पत्र काढून ज्या गावांमध्ये आयसाेलेशन सेंटर सुरू झाले आहेत, तेथे आवश्यक साेयीसुविधा पुरविण्यासंदर्भात पत्र दिले आहे.