उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या संसर्गास अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोविड प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. शिवाय, रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी डीसीएच, डीसीएचसी, डीसीसीस केंद्र कार्यान्वित केले आहेत. या ठिकाणी केवळ कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. या व्यतिरिक्त नॉन कोविड व नर्सिंग होममध्ये कोरोना संशयित व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करू नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी १३ मार्च रोजी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येऊ लागले. डिसेंबर व जानेवारी महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. त्यानंतर, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा ग्राफ वाढू लागला. मार्च महिन्यात दिवसाकाठी ३० ते ४० रुग्णांची भर पडू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढविले आहे. त्याचबरोबर रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी डीसीएच, डीसीएचसी, डीसीसीसी केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, येत्या काळात रुग्ण वाढू लागल्यास काेरोना संशयित व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर काही ठिकाणी अनधिकृतपणे नॉन कोविड रुग्णालयांमध्ये तसेच नर्सिंग होममध्ये दाखल करून उपचार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर रुग्ण इन्फेक्टेड होण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नॉन कोविड रुग्णालये, नर्सिंग होममध्ये अनधिकृतपणे कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करू नयेत, असा आदेश १३ मार्च रोजी जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालय व नर्सिंग होमवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.