कळंब : तालुक्यात आटोक्यात येत असलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी तालुक्यातील आठ गावांत २ व ३ जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना आदेश निर्गमित केले आहेत.
कळंब तालुक्यात ३० जूनच्या अहवालानुसार ४६ जण कोरोनाबाधित आहेत. आरटीपीसीआर चाचण्या संख्येने कमी होत असल्या तरी त्याचा पॉजिटिव्हिटी दर सरासरी १० टक्क्यांच्या पुढेच राहत असल्याने आरोग्य विभागाची चिंता कायम आहे. रॅपिड चाचण्यामध्ये हा दर सरासरी ५ टक्क्यांहून कमी राहत असला तरी त्यावर समाधान मानने मृगजळ ठरू शकते. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात चांगलीच प्रभावी ठरली होती. वाड्या वस्त्यावर कोरोना पोहोचल्याने शासकीय यंत्रणाची मोठी धावपळ उडाली होती. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जातो आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी ३० जून रोजी घेतलेल्या बैठकीत ग्रामीण भागात सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्याची सूचना केली होती.
याची गांभीर्याने दखल घेऊन कळंबचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांनी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्या-त्या गावातील सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या मंडळींची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. या चाचण्या १०० टक्के व्हायला हव्यात तसेच यासाठी सहकारी शासकीय यंत्रणांची मदत घेण्याचेही बीडीओ यांनी आदेशात म्हटले आहे.
चौकट -
दोन दिवस चालणार आरटीपीसीआर चाचण्या
२ व ३ जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नेहमीप्रमाणे रॅपिड चाचणी न करता आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बाधितांची नेमकी आकडेवारी समोर येईल. २ जुलै रोजी शिराढोण, डिकसळ, मंगरूळ व मोहा तर ३ जुलै रोजी खामसवाडी, ईटकूर, मस्सा (खं) व येरमाळा या गावात कोरोना चाचण्यासाठी कॅम्प होणार आहे. तालुक्यातील आठ मोठ्या गावात किती सुपर स्प्रेडर ॲक्टिव्ह आहेत, हे या चाचण्यानंतर समोर येणार आहे.
चौकट -
कोण ठरू शकतात सुपरस्प्रेडर?-
या मोहिमेत सुपरस्प्रेडर म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते अशा मंडळींची यादी प्रशासनाने दिली आहे. हॉटेल मालक, हॉटेल कामगार, मास मच्छी विक्रेते, किराणा, औषधी, कापड दुकानदार, पानटपरीचालक, केशकर्तनालय चालक, भाजी, फळविक्रेते व सर्व लहान मोठे व्यापारी हे सुपरस्प्रेडर ठरू शकतात. त्यांची १०० टक्के तपासणी करणे बांधकारक करण्यात आले आहे.
कोट..या मोहिमेत सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या मंडळींनी कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्या-त्या गावातील दुकानदार, व्यापारी, कामगार यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येणार नाही. मोहिमेनंतर त्या गावात आम्ही दुकानांची तपासणी करणार आहोत. जे तपासणी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांची दुकाने बंद ठेवण्यात येतील.
- नामदेव राजगुरू, बीडीओ