उस्मानाबाद : जिल्ह्यातील मृत्यूदर हा काळजीत भर टाकणारा आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मराठवाड्यात खालून दुसरा असलेल्या या जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र वरुन पहिला आहे. आरोग्य यंत्रणेची मनुष्यबळाअभावी वाताहत होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी जालन्यानंतर का होईना उस्मानाबादकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही पत्र लिहून टोपेंची सासरवाडी असलेल्या उस्मानाबादची आरोग्य यंत्रणा बळकट करावी, अशी मागणी केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात १० मे पर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या ४५ हजार ५३१ झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ हजार ६९६ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ७७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद औरंगाबाद विभागाच्या डॅशबोर्डला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ३४७ चाचण्या झाल्या आहेत. यातून जवळपास ३४.४८ टक्के अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ९ मेच्या अहवालात तर आरटीपीसीआर टेस्टपैकी निम्मे अहवाल पॉझिटीव्ह होते. हे अतिशय चिंताजनक आहे. शिवाय, १६ लाखांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच हजारच चाचण्या होत आहेत. एकिकडे पॉझिटिव्हीटी रेट वाढत असताना चाचण्या कमी होणे म्हणजे संक्रमणाचा धोका वाढविणे होय. त्यामुळे ट्रेसिंग व टेस्टिंग वाढण्याची गरज आहे.
दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे येथील भार वाढला असून, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना या विषयाचे गांभिर्य लक्षात आणून दिले होते. तेव्हा आपणही उस्मानाबाद जिल्ह्याची ही अवस्था सुधारण्यासाठी तातडीने उस्मानाबादेत वरिष्ठ अधिकार्यांसह बैठक घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना करुन द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. पाटील यांनी केली आहे.
मराठवाड्यात उस्मानाबाद अव्वल...मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला असता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४० टक्के मृत्युदर आहे. प्रति लाख लोकसंख्येमागे ६५ मृत्यू हाही दुर्दैवी उच्चांकी आकडा आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूरसारखी मोठी शहरे याबाबतीत उस्मानाबादच्या खालीच आहेत. औरंगाबादेत प्रति १ लाख लोकसंख्येमागे ५९ तर लातूर, नांदेडमध्ये प्रत्येकी ५४ मृत्यू आहेत. नांदेड वगळता मराठवाड्यातील अन्य कोणत्याही जिल्ह्याचा मृत्यूदर १.६० पेक्षा जास्त नाही.