तामलवाडी : पहिल्या लाटेत चौघे बाधित, तर एक जण मयत. त्यापाठोपाठ दुसऱ्या लाटेत सहा जण बाधित होऊन दोघांचा मृत्यू झाल्याने केमवाडी ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते. परंतु यानंतरच्या काळात नियमांचे काटेकोर पालन करीत अवघ्या पंधरा दिवसांत नागरिकांनी कोरोनाला गावाबाहेर हाकलले. मागील महिनाभरापासून हे गाव कोरोनामुक्त आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूची एवढी भीती नव्हते. परंतु, दुसऱ्या लाटेत सर्वच भागात मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. असे असतानाच केमवाडी गावातदेखील दुसऱ्या लाटेत सहा जण बाधित झाले. शिवाय, दोघांचा या आजाराने बळी घेतला. त्यामुळे गावकऱ्यांत चिंता वाढली होती. परंतु, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना धीर देत विविध उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला. अगोदर स्थानिकांच्या तपासणीसाठी गावात अँटिजन टेस्ट शिबिर घेण्यात आले. यानंतर प्रत्येक कुटुंबाची ‘डोअर टू डोअर’ फिरून आरोग्य तपासणी करण्यात आली. गावभर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यासोबतच स्वच्छता मोहीम, प्रतिबंधित क्षेत्र आदी बाबींवर ग्रामपंचायतीने भर दिला. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनीदेखील ग्रामपंचायतीच्या या उपाययोजनांना साथ देत नियमांचे कडक पालन केले. यामुळे दुसऱ्या लाटेत गावात प्रवेशित झालेला कोरोना अवघ्या पंधरा दिवसांत हद्दपार झाला.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण नसले तरी ग्रामस्थ बेफिकीर झाले नाहीत. यानंतरही त्यांनी नियमांचे पालन करणे सुरूच ठेवले. त्यामुळे मागील महिनाभरात गावात नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या तरी हे गाव कोरोनामुक्त आहे. यापुढेही कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. यासाठी सरपंच छाया डोलारे, उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल्य कोठे, आशा सेविका आशा काशीद, अंजना ताटे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला फंड, मालन डोलारे, सरोजा नकाते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशात फंड, पोलीसपाटील राजकुमार ताटे, तलाठी राजेंद्र अंदाने, मुख्याध्यापक जी. बी. काळे, पोलीस कर्मचारी बीट अंमलदार गोरोबा गाढवे, आकाश सुरनूर आदी परिश्रम घेत आहेत.
चौकट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात रुग्ण आढळून येताच तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रहिवाशांनीदेखील शासनाने सांगितलेल्या मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे मागील महिनाभरात गावात एकही रुग्ण नाही.
- छाया मारुती डोलारे,
सरपंच
चौकट
गावात कोरोनाचा शिरकाव झाला त्याचवेळी कुटुंबनिहाय घरभेटी देऊन सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रॅपिड तपासणीसाठी शिबिर घेतले. स्वच्छता मोहीम हाती घेऊन संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनीही उपाययोजनांना चांगली साथ दिली.
- श्रीशैल्य कोठे,
ग्रामविकास अधिकारी
केमवाडी हे तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील शेवटचे गाव. गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सुरुवातीला त्यांना धीर दिला. सोलापूर जिल्हा सीमेवर हे गाव आहे. त्यामुळे तातडीने तपासणी नाके सुरू केले. संसर्ग रोखण्यासाठी नियम मोडणाऱ्यांवर प्रसंगी कठोर कारवाई करावी लागली. गावकऱ्यांनी नियमांचे पालन करीत साथ दिली.
- सचिन पंडित, सपोनि, तामलवाडी