तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी भागातील २८ पैकी ९ गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे.
सद्य:स्थितीत परिसरातील काटी, खुंटेवाडी, माळुंब्रा सांगवी (काटी), गंजेवाडी, जळकोटवाडी, पिंपळा (बु), तामलवाडी, नांदुरी या गावांत ५० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चिंता वाढली असून, मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे .
दरम्यान, तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी तामलवाडी ग्रामपंचायतीस भेट देऊन कोविड-१९ चा वाढता संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. तसेच गावात स्वत: फिरून नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती केली. संचारबंदीचे उल्लघंन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सरपंच मंगलताई गवळी, उपसरपंच हमीद पठाण, हणमंत गवळी, ग्रामसेवक रेड्डी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या.
सांगवी येथे नागरिकांची तपासणी
सांगवी झोपडपट्टी भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने अंगणवाडी कार्यकर्ती सुनीता शिंदे, आशा कार्यकर्ती अर्चना मगर यांनी झोपडपट्टी भागातील नागरिकांची ऑक्सिमीटरने शरीरातील तापमानाची तपासणी करून घेतली. तसेच रविवारी सरपंच ललिता मगर, ग्रामसेवक बापूसाहेब दराडे, उपसरपंच मिलिंद मगर, रवी मगर यांनीही भेट देऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी साधू शिंदे, ग्रामपंचायत शिपाई रघुनंदन मगर, महादेव माळी, शिवाजी मगर, प्रकाश मगर, रामदास मगर, बडेभाई शेख, आदी उपस्थित होते.
लसीकरण थांबले
सावरगाव प्राथमिक अरोग्य केंद्रात आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस टोचण्यात आली. मात्र, लसीचा साठा संपल्यामुळे चार दिवसांपासून येथील लसीकरण बंद पडले आहे. येथे लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.