बलसूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील पहिला रुग्ण दहा ते बारा हजार लोकसंख्येच्या उमरगा तालुक्यातील बलसूर गावात आढळून आला होता. ही लाट ओसरते न ओसरते तोच दुसऱ्या लाटेतही गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले होते. त्यामुळे गाव रेड झोनमध्ये गेले. परंतु, यानंतरच्या कालावधीत प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकमेकांत समन्वय ठेवत राबविलेल्या उपाययोजनांमुळे सध्या हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गावात ७५ रुग्ण आढळून आले. हे गाव रेड झोनमध्ये गेल्यामुळे प्रशासनाकडून तातडीने गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्याकडून गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे तसेच वेळोवेळी जनजागृतीही करण्यात आली. विशेष म्हणजे गावातील कुठलीही लक्षणे नसलेल्या अनेक बाधित रुग्णांनी गृह विलगीकरणात राहून स्वतःची व कुटुंबाचीही काळजी घेत कोरोनावर मात केली. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना समज देण्यात आली. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधून जनजागृती केली. त्याला ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद मिळाल्याने काही दिवसांत कोरोनाला गावाबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
कोट................
ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांशी समन्वय राखत जनजागृती करण्यात आली. तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन ग्रामस्थांनी काटेकोरपणे केले. त्यामुळेच आता गाव कोरोनामुक्त झाले आहे.
- राजश्री नांगरे, सरपंच
गाव मोठे असल्याने दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करुन गावात फवारणी करण्यात आली. तसेच दररोज प्रत्येक कुटुंबाची बारकाईने माहिती घेण्यात आली. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली.
- सुरेश वाकडे, उपसरपंच
ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या सूचनांचे ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन केले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली. त्यामुळेच आज गाव कोरोनामुक्त झाले.
- एस. आर.पांढरे, ग्रामविकास अधिकारी.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी कुठलीही शंका, गैरसमज मनामध्ये न ठेवता प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळेच कोरोनावर मात करणे शक्य झाले.
- एस. बी. सगर, आरोग्यसेविका.
फोटो -
बलसूर येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई न करता समज देत त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.