उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी ६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. रात्री १० वाजता आलेल्या अहवालानुसार उमरगा तालुक्यातील ३, उस्मानाबाद तालुक्यातील २ तर परंडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आता कोरोनाचा गतीने फैलाव होत आहे. रविवारी रात्री ६ नवीन बाधितांची भर पडली आहे. उस्मानाबाद शहरातील जोशी गल्ली भागात सोलापूरहून आलेल्या एका १८ वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील एका ३० वर्षीय महिलेसही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ती नुकतीच मुंबईहून परतली आहे.
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे मुंबईहून परतलेल्या ३५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिला २० मे रोजी विलगिकरणात ठेवले होते. उमरगा शहरातील दोघांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील एकजण यापूर्वीच बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील आहे. परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील एका महिलेसही कोरोनाची लागण झाली आहे. ती यापूर्वी बाधित आढळून आलेल्या रुग्णासोबत मुंबईहून प्रवास करून आलेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली.
दरम्यान, आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ झाली असून, यातील ६ जणांना सुटी देण्यात आली आहे. सध्या २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.