कळंब (जि. उस्मानाबाद) : एचआरसीटी स्कोअर २१, ऑक्सिजन लेव्हल ५५ ते ६० च्या दरम्यान असतानाही रुग्णाची सकारात्मक मानसिकता आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे साठवर्षीय महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील सोनार लाइन येथे राहणाऱ्या शैलजा पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद येथे जाऊन एचआरसीटी तपासणी केली. त्यावेळी स्कोअर २१ आला होता. ५ मे रोजी एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तीन दिवसांत प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तेथील डॉक्टरांनी इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे रुग्णाला इतर ठिकाणी घेऊन जाणे धोक्याचे होते. अशा बिकट परिस्थितीत ९ मे रोजी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ५५ ते ६० च्या दरम्यान होती. परंतु, ‘मला काही होणार नाही’, हा शैलजा यांचा आत्मविश्वास आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार यामुळे शैलजा या आजारातून सुखरूप बाहेर पडल्या.
यांची मेहनत फळालारुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. इम्रान शेख यांनी या गंभीर रुग्णाची विशेष काळजी घेतली व डॉ. मीरा दशरथ, डॉ. गीत्ते, डॉ. निलेश भालेराव, डॉ. सुधीर आवटे यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे दोन वेळा खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व आ. कैलास घाडगे यांनी येऊन ‘आत्या, घाबरू नका. मला तुमच्या हाताने बनवलेला चहा प्यायचा आहे. तुम्ही धीर सोडू नका’, असे सांगून धीर दिला होता.