उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महामार्गावरील ढाबे, मंगल कार्यालयांना काही मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस दलाने झाडाझडतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार १७ जुलै रोजी ३३१ ढाबे व ९१ मंगल कार्यालयांची अचानक तपासणी केली. यापैकी १७ ढाबे चालकांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपायोजना केल्या जात आहेत. असे असतानाही जिल्ह्यात दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन उस्मानाबाद शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच तुळजापूरसह अन्य काही पालिकांनीही अशाच पद्धतीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे. यानंतरही रूग्णसंख्येचा आलेख उंचावतच आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे तसेच मंगल कार्यालयांना विविध मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे अनेकांकडून उल्लंघन होत असल्याची बाब पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी १७ जुलै रोजी ढाबे आणि मंगल कार्यालयांची झाडाडझती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील अठरा पोलीस ठाण्यांतर्गत येणारे ३३१ ढाबे आणि ९१ मंगल कार्यालयांची अचानक तपासणी करण्यात आली.
तपासणीअंती स्वच्छता, निर्जंतुकीकरण, व्यक्तीगत स्वच्छता, मास्क, हातमोजे, गॉगल, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दीचे बंधन याबाबत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १७ ढाबे चालकांविरूद्ध थेट गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये उमरगा तालुक्यातील तीन, लोहारा दोन, तुळजापूर दोन, तामलवाडी एक, उस्मानाबाद ग्रामीण तीन, आनंदनगर ठाणे चार व कळंब तालुक्यातील दोन ढाबे चालकांचा समावेश आहे. तर शिराढोण ठाण्यांतर्गत येणाºया तीन मंगल कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे ढाबे तसेच मंगल कार्यालय चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नियमांचे पालन करावे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मनाई आदेशाचे ढाबे तसेच मंगलकार्याल चालकांनी तंतोतंत पालन करावे. जे व्यवसायिक आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्याविरूद्ध कठारे कारवाई केली जाईल.- राज तिलक रौशन, पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद.