लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा शहरातील जेेवळी रस्त्याजवळील उदयराज बियर बार हॉटेलच्या मागच्या बाजूस अवैध विदेशी दारूची विक्री करताना आरोपी महादेव घोटाळे याला अटक करून त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहनासह तीन लाख ५५ हजार ११५ रूपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई उमरगा व तुळजापर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री केली आहे.
सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करणयात आला आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळात खुलेआम देशी विदेशी दारूची विक्री लोहारा शहरात केली जात आहे. शहरात उपलब्ध असलेल्या मद्यालातून चोरट्या पध्दतीने विदेशी दारूची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची चर्चा होती. याबाबत स्थानिक पोलिसांनीही संबंधित बियर बार परमिट रूम हॉटेल चालकांना दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देऊन तंबी दिली होती. तरीही काही बार चालक पोलिसांच्या आदेशाला धुडकावून राजरोस विदेशी दारूची विक्री केली जात होती.
याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रविवारी रात्री शहरातील जेवळी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंपा जवळील उदयराज बियरबार परमिट हॉटेलच्या मागच्या बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी दारूची विक्री करताना महादेव रावसाहेब घोटाळे (वय ४०) हा मिळून आला. याच्या ताब्यातील चारचाकी वाहानासह तीन लाख ५५ हजार ११५ रूपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई उमरगा येथील दुय्यम निरीक्षक के.टी.ढावरे, तुळजापूर येथील निरीक्षक आर.बी.पांडव, झेड.एस.काळे, एस. के. राउत,आर. बी.चांदणे यांनी केली.