उस्मानाबाद : संचारबंदी लागू झाल्यानंतरही उस्मानाबादेत सकाळी चित्र बदललेले नव्हते़ नागरिक रस्त्यांवरुन आपल्या वाहनांद्वारे धावताना दिसून येत होते़ वर्दळ वाढू लागता पोलिसांच्या तुकड्या चौका-चौकात तैनात झाल्या़ त्यांनी फटके देण्यास सुरुवात केल्यानंतरच रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले़
जमावबंदी लागू असतानाही सोमवारी नागरिकांची प्रचंड वर्दळ रस्त्यावर होती़ त्यामुळे अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांना गर्दी हटवावी लागली़ मंगळवारी संचारबंदी लागू झाल्यानंतरही वेगळे चित्र नव्हते़ सकाळी सहा वाजेपासूनच नागरिक रस्त्यावर दिसून येत होते़ आठ वाजेच्या सुमारास या गर्दीत आणखी भर पडली़ त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करीत चौका-चौकात तुकड्या तैनात केल्या़ यामुळे निष्कारण फिरत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविता आले़ सर्वाधिक वर्दळ आज राजमाता जिजाऊ चौकात व छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसून येत होती़ मात्र, पोलीस आल्यानंतर त्यांनी अनेकांना दंडुक्याचा प्रसाद दिला़ हे चित्र पाहून अनेकांना दुरुनच घराकडे पळ काढला़ तरीही दुचाकींची धावपळ अन्य रस्त्यावरुन सुरुच असल्याचे पहायला मिळाले़ भाजीपाला विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती़ पोलिसांनी गर्दी न करता अंतर राखून खरेदी करण्याच्या सूचना याठिकाणी नागरिकांना दिल्या़
किराणा दुकानांचेही शटर डाऊन
उस्मानाबादेत बरीचसी किराणा दुकाने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडली़ बुधवारी गुढीपाडव्याचा सण असल्याने या दुकानांसमोर नागरिकांची बरीच गर्दी झाली होती़ ती आवरत नसल्याने दुकानदारांनीच शटर खाली करीत केवळ एक व्यक्ती थांबेल अशी व्यवस्था करुन घेतली़ त्यानंतर रांगेने किराणा देण्यास सुरुवात केली़ पोलिसही याठिकाणी अधिक गर्दी न करता परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना करीत असल्याचे दिसले़