पाथरुड (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील मात्रेवाडी तसे छाेटेसे गाव. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या एकट्या गावात तब्बल २३ पाॅझिटिव्ह रूग्ण निघाले हाेते. गावात शिरकाव केलेल्या काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन प्रयत्न सुरू केले. कुठल्याही स्वरूपाची ढील न देता नियमांचे तंताेतंत पालन करण्यात आले आणि बघता बघता मात्रेवाडी हे गाव काेराेनामुक्त झाले. आजघडीला या गावात एकही रुग्ण नाही.भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावाने काेराेनाची पहिली लाट वेशीवरच राेखली हाेती. परंतु, दुसरी लाट राेखता आली नाही. छाेट्याशा या गावात काेराेनाचा फैलाव झाला. तब्बल २३ पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आले. या धाेक्याची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने उपायाेजना हाती घेतल्या. कसल्याही परिस्थितीत काेराेनाला राेखायचेच, असा निर्धार केला. ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांनीही तेवढीच खंबीर साथ दिली. सध्या त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. जे रुग्ण बाधित निघाले हाेते, ते सर्वजण उपचाराअंती बरे हाेऊन घरी परतले आहेत. २५ मे राेजी गावात काेराेना चाचणी कॅम्प ठेवण्यात आला हाेता. यावेळी ३१ जणांची चाचणी करण्यात आली असता, एकही पाॅझिटिव्ह निघालेला नाही. शंभर टक्के रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले.
Coronavirus: एकीचे बळ, गाव झाले काेराेनामुक्त, प्रशासन अन् मात्रेवाडी ग्रामस्थांचे एकत्रित प्रयत्न फळास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:39 AM