उमरगा (जि़उस्मानाबाद) : विदेशातून उमरगा तालुक्यात परतलेल्या ९ नागरिकांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब नमुने घेऊन त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले होते़ हे नऊ जण शनिवारी रात्रीतून रुग्णालयातून पसार झाले आहेत़ प्रशासनाकडून त्यांचा आता शोध घेतला जात आहे़
उमरगा तालुक्यातील अनेक नागरिक रोजीरोटीसाठी मुंबई-पुणे शहरात आहेत़ बरेचजण विदेशातही गेले आहेत़ हे नागरिक आता कोरोनाच्या भीतीमुळे गावाकडे परतू लागले आहेत़ आरोग्य विभागाकडून अशा नागरिकांची माहिती काढून त्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मात्र, संबंधित नागरिक यास अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत़ याचीच अनुभूती उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला शनिवारी रात्री आली़ रविवारपर्यंत सिंगापूर, दुबई, सौदी अरेबिया, अमेरिका आदी ठिकाणावरुन तालुक्यात आलेल्या १५ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. यापैकी अमेरिकेतील शिकागो येथून न्यूयार्कमार्गे आलेल्या एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. तर उर्वरीत १४ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान, २१ मार्च रोजी स्वॅब नमुने घेऊन उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच्या निगराणीखाली ठेवलेले नऊ जण रुग्णालयातून रात्री उशिरा पसार झाले आहेत.
उमरगा पोलिसांत तक्रार दाखलयाबाबतची लेखी तक्रार रात्रीच उमरगा पोलिसांना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित पुरी यांनी दिली आहे़ पसार झालेल्यांपैकी एकाचाही कोरोना रिपोर्ट अद्याप आलेला नाही. असे असतानाही ते परस्पर निघून गेले आहेत़ दरम्यान, कोरोना तपासणीसाठी वाढत असलेली नागरिकांची संख्या लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी रविवारी बंद करण्यात आली होती़
संपर्क साधण्याचे प्रयत्न चालूविदेशातून परतलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन त्यांना १५ दिवस निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. शनिवारी रात्री एक महिला कर्मचारी ड्यूटीवर होत्या. नऊ जणांना त्या एकट्या रोखू शकल्या नाहीत. जे रुग्ण रातोरात निघून गेले आहेत, त्यांची लेखी माहिती पोलिसांना तातडीने दिली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालयात उमरगा