परंडा (उस्मानाबाद) : परंडा तहसील कार्यालयात कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता करुन तब्बल १६ लाखांचा अपहार केल्याचा ठपका तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांच्यावर चौकशी समितीने ठेवला आहे़ या समितीच्या अहवालानंतर बुधवारी त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०११ ते १३ या कालावधीत वैशाली पाटील या परंडा तहसील कार्यालयात कार्यरत होत्या़ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होवून अपहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ याअनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी भूमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती़ या समितीने वैशाली पाटील यांच्या कार्यकाळातील रोजगार हमी योजनेच्या सर्वच अभिलेख्यांची तपासणी करुन ३१ जुलै २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.
या अहवालात १५ लाख ९२ हजार ७९८ रुपये रोख पुस्तिकेमध्ये कमी दर्शविल्याचे व १७ हजार ८१ रुपये अतिप्रदान केल्याचे नमूद केले आहे़ हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी नियाजन विभाग रोहयोच्या उपसचिवांना सादर केला़ तसेच विभागीय आयुक्तांकडे पाटील यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर कला़ दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी रोहयाच्या उपसचिवांनी पत्र पाठवून अपहाराची रक्कम लक्षात घेता तक्रार नोंदविता येईल, का हे तपासण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली़ या पत्रानुसार त्यांनी जिल्हा सरकारी वकिलांकडून कायदेशीर अभिप्राय मागविला होता.
याचा अभिप्राय ३१ डिसेंबर २०१८ रोजी प्राप्त होवून त्यात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी दोषीविरुद्ध गुन्हा दाखल करणे उचित राहील, असे म्हटले आहे़ या अभिप्रायानंतर परंड्याचे विद्यमान तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याविरुद्ध अपहाराची तक्रार दिली़ पोलिसांनी या प्रकरणी कलम ४०६ व ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़