वाशी : दुचाकीवरून जात असताना मुख्य वीज वाहिनीची तार तुटल्यामुळे खाली आलेल्या गार्डिंगमधील विद्युत धक्का बसल्याने शेतकरी पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना १५ मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील सोलापूर ते संभाजी नगर महामार्गावरील सरमकुंडी फाट्यानजीक घडली. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाकाईंनी केली आहे.
तालुक्यातील येसवंडी येथील ३३/११ वीज उपकेंद्रातून रामकुंड, वाकवड या भागात विद्युतपुरवठा करण्यात येतो़ यासाठीची मुख्य वीज वाहिनी महामार्गावरून गेलेली आहे. दरम्यान, १५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रामकुंड येथील शेतकरी रामदास देविदास हाके हे पत्नी उर्मिला यांच्यासह दुचाकीवरून आंबे विकण्यासाठी सरमकुंडी फाट्याकडे जात होते. याच वेळी वाकवड शिवरात शेतीवाहिनीसाठी असलेली मुख्य वाहिनीची तार तुटून ती मुख्य वाहिनीच्या खाली असलेल्या गार्डींगवर पडली व गार्डींग तुटून रस्त्यावर पडली़ यावेळी महामार्गावरून जात असलेल्या रामदास व उर्मिला यांना या गार्डींगमधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांवरही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वीज कंपनीचे अभियंता यादव यांनी रूग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.
वीज वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्षमहावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. तीन आठवड्यांपूर्वीच वाशी येथे दसमेगाव रोडलगत असलेल्या रमाकांत उंदरे यांच्या शेताततील शेडवर मुख्य वाहिनीची तार तुटून त्यांच्या दोन गायी दगावल्य होत्या़ या शेतकऱ्यास अद्याप कसलीही मदत मिळालेली नाही. त्यातच आज पुन्हा रामकुंड शिवारात मुख्य वाहिनीची तार तुटून शेतकरी पती-पत्नी जखमी झाले. वीज कंपनीकडून शेतातील वीज वाहिनच्याची कामे न केल्यामुळे हे अपघात घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.