उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, काही शेतकऱ्यांनी मृगात पाऊस होईल, या अपेक्षेने अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस करीत चाढ्यावर मूठ धरली आहे.
मागील वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्याही वेळेत झाल्या होत्या. मात्र, यंदा अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडेल की काय अशी भीती शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कडून बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही दिवसांत पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या आकाशात पावसाचे ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नाही. काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी धाडस करत जेमतेम पावसावर पेरणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात १३९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक ६९० हेक्टर आहे. याशिवाय २८५ हेक्टरवर उडीद, २२० हेक्टरवर तूर, तर १९५ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या दिवसभर कडक ऊन पडत असून, पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोट.....
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करताना बीजप्रक्रिया करून घ्यावी, खतांचा संतुलित वापर करावा. खताची बचत करावी व सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. बीबीएफद्वारे पेरणी केल्याने उत्पादनामध्ये वाढ होण्यासोबतच औषध फवारणीसाठी जागा मोकळी राहते. तसेच जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी सरीवाटे निघून जाते. पाऊस कमी झाल्याने सरीचे पाणी पिकांना उपलब्ध होते.
- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा