रायगड मंगल कार्यालयात भाटशिरपुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण राठोड हे मंगळवारी रात्री ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत रुग्णांवर देखरेख व उपचारांसाठी कर्तव्यावर होते. यावेळी ते मद्यप्राशन करून आले होते. तसेच कोविड सेंटरवरील उपचार घेणाऱ्या दोन महिला चक्कर येऊन पडल्या तरी त्यांच्यावर उपचार केले नाहीत. इतर रुग्णांशी अरेरावीची भाषा वापरली. कोविड केअर केंद्र हे संवेदनशील ठिकाण असताना तेथे विनातक्रार सेवा देणे कर्तव्य असताना हे वागणे खेदजनक असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे. यादरम्यान केंद्रावर महसूल विभागाच्या नायब तहसीलदार यांनी भेट दिली असता, त्यावेळी डॉ. राठोड गैरहजर होते. या सर्व प्रकाराबाबत खासदार व आमदार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यमुक्त केलेल्या पत्रात म्हटले आहे. यानंतर डॉ. राठोड यांना त्वरित जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जाऊन हजर व्हावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
चौकट -
तहसीलदार यांनीही बजावली नोटीस...
कळंबचे नायब तहसीलदार प्रथमेश भुके यांनी मंगळवारी रात्री रायगड मंगल कार्यालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता तेथे नियुक्त असलेले डॉ. प्रवीण राठोड हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच तेथील रुग्णांनी ते मद्यपान करून ड्युटीवर आल्याची माहिती दिली. या सर्व बाबी शासनाच्या कोरोना आपत्ती निवारण नियमांचा भंग करणाऱ्या असून, याप्रकरणी आपला वैद्यकीय परवाना रद्द करून आपल्यावर कायदेशीर कार्यवाही का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस कळंब तहसीलदार रोहन शिंदे यांनी डॉ. राठोड यांना बजावली आहे.
डॉक्टरांचा व्हिडिओ वायरल...
कोविड सेंटरवर मद्य पिऊन आलात का? असा जाब डॉक्टरांना विचारणारा काही तरुणांचा व्हिडिओ बुधवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. याबाबत विचारणा केली असता, संबंधित डॉक्टर तेथून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. हा व्हिडिओसमोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.