उस्मानाबाद : जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती येऊ लागली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून आरोग्य विभागाकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील ७२ केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस मिळणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अनेक नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने काही मोजक्याच केंद्रांवर लस उपलब्ध करून दिली जात आहे. शनिवारी ७० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ५७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर कोविशिल्डचा पहिला डोस ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना मिळणार आहे, तर दोन नागरी आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, पोलीस रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच दुसरा डोस मिळणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कोणास किती मिळणार डोस?
५७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रत्येकी २५० डोस
४ उपजिल्हा रुग्णालये ३०० डोस
६ ग्रामीण रुग्णालये २५० डोस
जिल्हा रुग्णालय ३००
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ३००
दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २५०
पोलीस रुग्णालय, उस्मानाबाद २५०