धाराशिव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना हात आखडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील दहा बॅंकांविरूद्ध थेट पाेलीस कारवाईचे आदेश पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी दिले हाेते. त्यानुसार पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना नाडलेल्या दहा बॅंकाविद्ध जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत.
राज्याचे आराेग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांच्या उपस्थित १८ जुलै राेजी जिल्हा नियाेजन समितीची बैठक झाली हाेती. यावेळी पीक कर्जाच्या अनुषंगाने बॅंका शेतकऱ्यांना नाडत असल्याचे समाेर आले. ही बाब गंभीर असल्याचे सांगत पालकमंत्री प्रा. डाॅ. सावंत यांनी संबंधित बॅंकांविरूद्ध थेट पाेलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. ओम्बासे यांनी बॅंकनिहाय पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता, एक-दाेन नव्हे तर दहा बॅंकांची कामगिरी सुमार असल्याचे समाेर आले. यामध्ये बंधन बॅंक, डीसीबी बॅंक, आयडीएफसी बॅंक, इण्डसंड बॅंक, काेटक महिंद्रा बॅंक यांनी शेतकऱ्यांच्या हातावर पीक कर्जापाेटी छदामही टेकविलेला नाही. तर इंडियन बॅंक १४.१६ टक्के, इकाे बॅंक१४.२३ टक्के, स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नळदुर्ग १८.५५, लाेहारा शाखा १९.५५ तर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कळंब शाखेने १६.४९ टक्केच कर्ज वितरित केले आहे. या सर्व बॅंकांच्या शाखा अधिकाऱ्यांच्या विराेधात त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पीक कर्ज वाटपात हात आखडता घेणाऱ्या बॅंकांमध्ये खळबळ उडाली आहे.
५६ टक्केच कर्ज वाटप...धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे १०० टक्के पीक कर्ज वाटप करावे, असे पालकमंत्री प्रा. डाॅ. सावंत यांनी वेळाेवेळी आदेश दिले हाेते. यानंतरही काही बॅंका जुमानायला तयार नव्हत्या. १५ ऑगस्टपर्यंत केवळ ५६.१६ टक्के कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे मुजाेर बॅंकाविरूद्ध गुन्हे नाेंदविण्याचे आदेश त्यांनी दिले हाेते. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. ओम्बासे यांच्या सूचनेवरून दहा बॅंकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.