उस्मानाबाद : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास किमान उत्पादन खर्च तरी हाती पडावा, यासाठी शेतकरी आपली पिके विमा संरक्षित करून घेतात. परंतु, यात शेतकरी कंगाल अन् विमा कंपन्या मालामाल हाेत असल्याचा प्रकार समाेर आला आहे. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात पीक विमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून सुमारे ६३९ काेटी रुपये भरले हाेते. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केवळ ८७ काेटी रुपये मिळाले. परिणामी पाचशे ते साडेपाचशे काेटींचा विमा कंपनीला फायदा झाला.
वादळी वारे, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, राेगराई, आदी कारणांमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठे नुकसान हाेते. अनेकवेळा काढणीला आलेली पिके वाया जातात. अशावेळी शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे काेलमडून पडते. आर्थिक कणाच माेडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डाेक्यावरील कर्जाचा बाेजा वाढत जाताे. यातून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. दरम्यान, शेतकऱ्यांचे अर्थकारण माेडून पडू नये, यासाठी पिकांचा विमा उतरविला जाताे. यातून शंभर टक्के नुकसान भरून निघत नसले तरी किमान उत्पादन खर्च हाती पडताे. मागील काही वर्षांत विशेषकरून खरीप पिके काढणीला आली असताना नैसर्गिक संकटे ओढावतात. हा अनुभव लक्षात घेता शेतकरी आता आपली पिके विमा संरक्षित करण्याकडे वळले आहेत. हीच संधी साधत विमा कंपन्याही आपले उखळ पांढरे करून घेऊ लागल्या आहेत. २०२०-२१ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील सुमारे ९ लाख ४८ हजार ९९० अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला हाेता. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्यापाेटी ४१ काेटी ८५ लाख, राज्य शासनाच्या हिश्श्यापाेटी ३२२ काेटी ९५ लाख आणि केंद्र सरकारने स्वत:च्या हिश्श्यापाेटी २७४ काेटी २१ लाख असे एकूण ६३९ काेटी २ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले हाेते. प्रत्यक्ष भरपाई मात्र ७९ हजार १२१ अर्जदार शेतकऱ्यांनाच मिळाली आहे. ही रक्कमही अवघी ८७ काेटी आहे. त्यामुळे या व्यवसायात शेतकरी ताेट्यात अन् विमा कंपनी पाचशे ते साडेपाशे काेटींनी फायद्यात राहिली आहे. म्हणजेच शेतकरी नव्हे, तर विमा कंपनी मालामाल झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास नष्ट हाेण्यास फारसा अवधी लागणार नाही.
चाैकट....
भूममध्ये सर्वाधिक अर्जदार...
जिल्हाभरातून सुमारे ९ लाख ४८ हजार ९९० शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. यात भूम तालुका आघाडीवर आहे. सुमारे १ लाख ५१ हजार ९३६ अर्जदार शेतकरी आहेत. तसेच कळंब १ लाख २१ हजार ११८, लाेहारा ६२ हजार ३५३, उस्मानाबाद १ लाख ३४ हजार २५, परंडा १ लाख २९ हजार ५८३, तुळजापूर १ लाख ३७ हजार १८८, उमरगा १ लाख ३ हजार ५९९ आणि वाशी तालुक्यातील १ लाख ९ हजार ११८ लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांच्या प्रमाणात विमा काही मिळला नाही, हे विशेष.
चाैकट...
साडेआठ लाखांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा...
नैसर्गिक संकटामुळे तळहातावरील फाेडाप्रमाणे जपलेल्या जपलेली पिके वाया गेल्यास किमान उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च तरी विम्याच्या माध्यमातून हाती पडावा, यासाठी मागील काही वर्षांत माेठ्या प्रमाणात शेतकरी पिकांचा विमा उतरू लागले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सुमारे ९ लाख ४८ हजार ९९० शेतकऱ्यांनी अर्ज केला हाेता. विमा हप्त्यापाेटी केंद्र, राज्य व शेतकऱ्यांनी एकत्रित सुमारे ६३९ काेटी रुपये विमा कंपनीच्या तिजाेरीत भरले. परंतु, प्रत्यक्ष नुकसान भरपाई ७९ हजार १२१ शेतकऱ्यांनाच मिळाली. आजही तब्बल ८ लाख ६९ हजार ८६९ शेतकऱ्यांना छदामही मिळालेला नाही. शासनस्तरावरून यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बाेलले जात आहे. परंतु, आजवर शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलेले नाही.
खरीप हंगाम
२०२०-२१
पीक विमा लागवड क्षेत्र
५१८०६५.५१ हेक्टर
एकूण जमा रक्कम
६३९०२.९१ लक्ष
एकूण पीक विमा मंजूर - ८६९६.७४ लक्ष
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ४१८५.५९ लक्ष
राज्य सरकारने भरलेले पैसे - ३२२९५.४८ लक्ष
केंद्र सरकारने भरलेले पैसे -२७४२१.८४ लक्ष
विमा काढणारे शेतकरी -९४८९९०
लाभार्थी शेतकरी - ७९१२१
आतापर्यंत वाटप केलेली रक्कम -८६९६.७४