उस्मानाबाद : २०२२ सालच्या खरीप हंगामातील भरपाई विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात दिला नसल्याचा आरोप करीत मंगळवारी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. कंपनीच्या कार्यालयात कर्मचार्यांना काळे फासून साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप २०२२ च्या हंगामात पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने ७० ते ८० टक्के नुकसान असतानाही अत्यंत तोकडी भरपाई वितरीत केली आहे. आतापर्यंत केवळ अडीचशे कोटी इतकीच भरपाई शेतकर्यांना देण्यात आली आहे. यातही अनेक शेतकर्यांना क्षेत्र मोठे असतानाही शेकड्यात भरपाई मिळाली. लाखो शेतकर्यांच्या पूर्वसूचना नाकरण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खा.ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी केला होता. दरम्यान, कंपनीने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्याच्या प्रती आठवड्यात प्रशासनाकडे उपलब्ध करुन देण्याचा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता.
मात्र, कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी १.१५ वाजता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत उपस्थित कर्मचार्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. यानंतर कार्यालयातील खुर्च्या, टेबल व इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली. विमा कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करीत कर्मचार्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले. आता कंपनीच्या पुणे येथील मुख्यालयात अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी याप्रसंगी सांगितले.