तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन एकरातील साेयाबीन पीक वाया गेले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
वडागाव काटी येथील नवनाथ नरहरी धावणे यांना तीन एकर जमीन आहे. चार पैसे हाती पडावेत, यासाठी त्यांनी खरीप हंगामात संपूर्ण क्षेत्रात साेयाबीनचे पीक घेतले. पीकही जाेमदार आले हाेते. हे पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. या पावसामुळे साेयाबीन पीक पाण्याखाली गेले. हाताताेंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा,? या विवंचनेत ते हाेते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी शेतातील गाेठ्यासमाेर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. देवानंद पंडित धावणे (रा. वडगाव काटी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.