दिवसभरात १६४ चालकांनी केली कार्यवाही पूर्ण
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील टोल नाक्यावर वाहनचालकाना फास्टटॅग शिवाय प्रवेश नसल्याने मंगळवारी फास्टटॅग काढण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी दिसून आली. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तब्बल १६४ चालकांनी आपापल्या वाहनांचे फास्टटॅग काढून घेतले. यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
केंद्र सरकारने रस्त्यावरील टोल हा रोख रक्कमेच्या स्वरूपात न भरता तो कॅशलेसच्या माध्यमातून भरला जावा यासाठी फास्टटॅग ही नवीन प्रणाली अंमलात आणली आहे. या प्रणालीमुळे वाहनचालकांच्या वेळेत बचत होणार आहे. शिवाय टोलनाक्यावरील आर्थिक व्यवहार कॅश लेस असल्याने पावती देण्याचाही प्रश्न उपस्थित होणार नाही. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅग काढण्याची मुदत दिलेली होती. ती संपल्यानंतर कोणत्याही वाहनांना रोख रक्कम देऊन पुढे जाता येत नसल्याने फास्टटॅग काढावाच लागत होता. दरम्यान, मंगळवारी येथील टोलनाक्यावरून फास्टटॅग नसलेल्या वाहनांना प्रवेश दिला जात नसल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली होती. रात्री साडेसात वाजेपर्यंत येथे १६४ चालकांनी फास्टटॅग काढून घेतले.
कोट........
शासनाच्या आदेशानुसार यापुढे कोणतेही वाहन फास्टटॅग शिवाय रोख रक्कम घेऊन सोडता येणार नाही. त्यामुळे आजपासून प्रत्येक वाहनांना फास्टटॅग काढूनच पुढे जावे लागले. मंगळवारी दिवसभरात १६४ वाहनचालकांनी आपल्या वाहनाचे फास्टटॅग काढून घेतले आहेत.
- रवी कलबंड, व्यवस्थापक, टोलनाका