उमरगा : तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. असे असले तरी सोमवारी शासनाचे सर्व नियम धुडकावत नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले.
शहरात मागील आठवडाभरापासून अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. व्यापारी, नागरिकांकडूनदेखील यास चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, सोमवारी सकाळी मात्र सर्व नियम धाब्यावर बसवित नागरिक बाजारात दाखल झाले. दुपारी जवळपास एक वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती. यात फिजिकल डिस्टन्स, मास्क वापर याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. व्यापारीही ग्राहकांना याबाबतचा आग्रह करत असल्याचे दिसून आले नाही. पालिका कर्मचारी मुख्य बाजारपेठ व चौकात उपस्थित होते. परंतु, या गर्दीला त्यांनाही हाताळता येत नसल्याने हतबल होऊन पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. यादरम्यान पोलीस कर्मचारी मात्र कुठेही दिसून आले नाहीत. शेवटी या गर्दीची चर्चा शहरातील विविध सोशल मीडियावर झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने बाजारपेठ व इतर दुकाने बंद करण्यासाठी कर्मचारी पाठविले. दुपारी एकनंतर शहरातील सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या.
चौकट.......
समन्वयाचा अभाव
उमरगा तालुक्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, दुसऱ्या लाटेत दीड हजाराच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोपतरी उपाययोजना केल्या जात असून, साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे काम स्थानिक पातळीवरील प्रशासनाचे आहे. परंतु, स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस व पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याचेच आजच्या गर्दीवरून दिसून येत आहे.