तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कच्च्या तेलाची वाहतूक करणारा टॅंकर समाेरील उसाच्या ट्रॅक्टरवर जावून आदळला. या भिषण अपघातानंतर टॅंकरमधील तेल घेऊन जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची झुंबड उडाली. ही घटना २४ नाेव्हेंबर राेजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास साेलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी मार्डी गावानजीक घडली. या दुर्घटनेत टॅंकरचालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजकाेट येथून कच्चे खाद्यतेल घेऊन टॅंकर (क्रं. जीजे.३६-टी.५९४४) साेलापूर मार्गे बेंगलाेर येथे जात हाेता. हा टॅंकर तुळजापूर-साेलापूर मार्गावरील सांगवी मार्डी गावानजीक आला असता, अचानक स्टेअरिंग फेल झाले. त्यामुळे हा टॅंकर समाेरील उसाच्या ट्रॅक्टरवर (क्रं.एमएच.२४-ई-७५७२) जावून आदळला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, तेलाचे टॅंकर एका बाजुला अन् चेसी दुसरीकडे पडली. त्यामुळे तेलाच्या टॅंकरला गळती लागली. अपघाताची वार्ता परिसरात पसरताच तेल नेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली.
काेणी हंडा, काेणी घागर तर काेणी दुधाच्या कॅनमधून तेल घेऊन जात हाेते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाेउपनि बसवेश्वर चनशेट्टी, पाेहेकाॅ रविंद्र शिंदे, दिलीप राठाेड, पांडुरंग माने, पाेलीस पाटील सजंय बागल यांनी घटनास्थळी धाव घेत तेल नेण्यास ग्रामस्थांना अटकाव केला. यानंतर रस्त्यावर पडलेले हे टॅंकर क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजुला करण्यात आले. सांडलेल्या तेलावर माती काटून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी टॅंकरचालक पवनकुमार सतबखत सिंह (वय ४४) हे जखमी झाले आहेत.