धाराशिव :मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याचे कारण देत धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत.आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको, निदर्शने, उपोषण अशी आंदोलने सुरू आहेत. यातच तुरोरी येथे कर्नाटक परिवहन मंडळाची एक बस जाळण्यात आली आहे. शिवाय शेजारच्या बीड जिल्ह्यात आंदोलनास हिंसक वळण लागल्याने धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा संचारबंदी आदेश काढले आहेत. पुढील आदेशापर्यंत सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
संचारबंदीतून केवळ यांना सूट...
शासकीय, निमशासकीय कार्यालये, दूध वितरण, वीजपुरवठा यंत्रणा, दूरध्वनी व इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, पाणीपुरवठा यंत्रणा, बँका, दवाखाने व औषधी दुकाने, रस्ते व रेल्वे वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील आयटी यंत्रणा, अंत्यविधी व अंत्ययात्रा.