कळंब : विद्यार्थ्यांना कधी एकदा शाळेला सुट्ट्या लागतात याचे वेध लागत असत. पण कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने जवळपास दीड-दोन वर्षे शाळाबाह्य राहिलेल्या मुलांना आता शाळा कधी सुरू होतील याचे वेध लागल्याचे चित्र आहे.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत असताना शाळा सुरू करण्याचा हा बाळहट्ट सध्या तरी मान्य होण्याची शक्यता नाही. मास्क वापरू, हात धुवू, वर्गात अंतर ठेवूनही बसू.... तुमचं सगळं सगळं ऐकू पण सरांना शाळा सुरू करायला सांगा अशी आग्रही मागणी ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी केल्याचा अनुभव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितला. गावागावात फिरताना ग्रामीण भागातील मुलांनी आवर्जून भेट घेऊन ही मागणी केल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी असताना संजय पाटील दुधगावकर यांनी कळंब तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना नवीन इमारती तसेच दुरुस्तीसाठी निधी दिला होता. त्यामुळे राजकीय, वैयक्तिक दौऱ्यावर असताना ते त्या त्या गावातील शाळांना अवश्य भेट देतात. सध्या कळंब तालुक्यात पक्षीय गाठीभेटी घेताना शाळेच्या परिसरात गेले की तेथे खेळणारी मुले धावत येतात. शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न मुले विचारतात. कोरोनामुळे शाळा बंद आहे. तो गेल्यावर सुरू होईल, असे सांगितल्यावर कोरोनाचे सगळे नियम पाळू पण शाळा चालू करण्याचा आग्रह त्यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी होतो असे दुधगावकर यांनी सांगितले. शासन, प्रशासन त्यांची जबाबदारी सांभाळत आहे. शाळा सुरू करणे आता धोक्याचे ठरू शकते. पण लहान मुलांना सांगणार कोण? हा प्रश्नही सध्या उभा राहतो आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६० शाळेतील सातवीपर्यंतचे तब्बल २२ हजार विद्यार्थी सध्या कोरोनामुळे शाळाबाह्य आहेत. जेथे कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे तेथे ८ वी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील त्या शाळांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. शहरात अजून त्या शाळांना परवानगी दिली नाही.
चौकट-
कोरोनाने दोन शिक्षकांचा बळी
तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधून १०९० शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनाने तालुक्यातील २ शिक्षकांचा बळी घेतला. तालुक्यात किती शिक्षक कोरोना बाधित झाले याची नेमकी माहिती शिक्षण विभागाकडे नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका मुलांना आहे तसा शिक्षकांनाही असणार आहे.
शाळांना तूर्तास कुलूपच
शासन-प्रशासनाच्या सूचनांच्या अधीन राहूनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८ वी ते बारावीपर्यंतचे वर्गही काही ठिकाणी चालू आहेत, अशी माहिती कळंबचे गटशिक्षणाधिकारी तोडकर यांनी दिली.
पाॅईंटर...
शाळा कधी भरते याबाबत मुलांमध्ये उत्सुकता असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ९२ पैकी केवळ १ ते २ गावातूनच शाळा चालू करण्याबाबत शिक्षण विभागाला विचारणा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोना झिरो होत नाही तोपर्यंत शाळा १०० टक्के भरणार नसल्याचे चित्र दिसत आहे.