नळदुर्ग : येथील आलियाबाद शिवारातील बोरी नदीवर बांधलेल्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या पात्रात मगर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. गुरुवारी दुपारी बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्यात मगर दिसल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
यावेळी दिसून आलेल्या मगरीची लांबी जवळपास सहा फूट असून, ती मध्यम आकाराची आहे, असे वन परिमंडळ अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. नळदुर्ग किल्ल्याला वळसा घालून पुढे गेलेल्या बोरी नदीपात्रावर सोलापूर हैदराबाद-राष्ट्रीय महामार्गालगतच्या अलियाबाद पुलाजवळील उच्च पातळी बंधारा बांधण्यात आला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन आलेल्या पाण्यामुळे बंधारा ओव्हरफ्लो झाला होता. दरम्यान, गुरुवारी शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्यात मगर दिसल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर वनक्षेत्र विभागाचे अधिकारी राहुल शिंदे, त्यांचे सहकारी चव्हाण, विनायक पवार व एका वन विभागाचे मजूर यांनी गुरुवारी दुपारपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाहणी केल्यानंतर मगर त्यांच्या निदर्शनास आली. दोन महिन्यांपूर्वी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ही मगर या भागात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असून, या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याबाबत आवाहन केले आहे. शिवाय दोन वनमजूर या ठिकाणी पुढील दोन-तीन दिवसासाठी मगरीवर पाळत ठेवण्यासाठी तैनात केले आहेत.
चौकट.....
उस्मानाबादचे विभागीय वन अधिकारी मच्छिंद्रनाथ गायके यांनी मगर दिसून आल्याबाबत दुजोरा देऊन सदर मगरीचा अधिवास हा बोरी धरण असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. अति पावसामुळे ती बाहेर आली आहे. ही मगर आकाराने मध्यम आहे. मात्र, हल्ला करू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. शेतकरी व नागरिकांनी बंधाऱ्यातील पाण्यात पोहणे, मासेमारी, जनावरे धुण्यासाठी घेऊन जाऊ नये. लवकरच त्या ठिकाणी नागरिकांनी घ्यावयाच्या सुरक्षेबाबतचा माहिती फलक लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.