वाशी येथील ३५ वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाल्यामुळे येथील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर २० एप्रिल रोजी त्यास होम क्वारंटाईन राहण्यासाठी घरी सोडण्यात आले. परंतु, चोवीस तासांच्या आतच त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे तो २१ एप्रिल रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास तातडीने येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे जुजबी उपचार करून त्यास इतर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. हा बाधित उस्मानाबाद येथे गेला असता त्यास सोलापूर येथे पाठविण्यात आले. परंतु, तेथेही बेड शिल्लक नसल्यामुळे त्यास परत पाठविण्यात आले. यामुळे नातेवाइकांनी त्याला बार्शी येथे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांची कमतरता
मयत युवकाचा मृतदेह नातेवाइकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्यास पीपीई किट कुणी घालायचे यावरून बराच वेळ मृतदेह रुग्णालयात पडून होता. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलदेव पाटील यांनी कोरोना केअर युनिटमधील शिपायाला बोलावून मृतदेह पीपीई किटमध्ये बंदिस्त करून घेतला. यानंतर रात्री उशिरा नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला. परंतु, यानंतरही नगर पंचायतीकडे प्रशिक्षित केवळ तीनच कर्मचारी असल्यामुळे मयताच्या नातेवाइकांनाच पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करावे लागले.