तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर शहरातील शासकीय गोदाम येथे अज्ञातांनी २६ वर्षीय युवकाच्या पोटात तसेच छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्त्या केली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर आराेपी पसार झाले.
अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील तरूण शंकर दाजी पवार (वय २६) हा आपल्या मित्रासाेबत गुरूवारी तुळजापूर येथे आला हाेता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याने साेबत आलेल्या मित्रांना, ‘‘आपण येथेच थांबा. मी शासकीय गाेदामातून आलाे’’, असे सांगून ताे तेथून गाेदामाकडे गेला. आणि काही क्षणताच त्याच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केले. हल्लेखाेरांच्या तावडीतून सुटून रक्तबंबाळ अवस्थेत धावत ताे तुळजापूर-नागपूर-रत्नागिरी या मार्गावर येऊन काेसळला. तरीही हल्लेखाेर त्याचा पाठलाग करीत हाेते. परंतु, त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून हल्लेखाेर पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दरम्यान, तुळजापूर शहरातील काही तरूण व पाेलिसांनी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या शंकरला खाजगी कारमधून उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काक्रंबा गावासह परिसरातील ग्रामस्थांनी रूग्णालय परिसरात माेठी गर्दी केली हाेती. या प्रकरणी तुळजापूर पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
दोन पथके रवाना...दिवसाढवळ्या झालेल्या खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आराेपींचा शाेध घेण्यासाठी दाेन पथके स्थापून ती तैनात केली आहेत. पथकात एका अधिकाऱ्यासह चार पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पाेनि अजिनाथ काशीद यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
पाेलीस अधिकारी घटनास्थळी...घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख,पोलीस निरीक्षक अजीनाथ काशीद,सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पाेउपनि चनशेट्टी, सहाय्यक पोलीस फौजदार साहेबराव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पाेकाॅ. डी. बी. माळी, रवी भागवत, गौतम शिंदे, पाेहेकाॅ. आत्माराम सावरे, पाेकाॅ. गोवर्धन माने आदी उपस्थित हाेते.