उस्मानाबाद : शेतजमिनीच्या वादातून अधिवेशन काळात विधानभवानाबाहेर पेटवून घेतलेल्या तांदुळवाडी येथील शेतकऱ्याचा सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याबाबतच्या वृत्तास उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.
वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता. यातूनच अधिवेशन सुरु असताना २३ ऑगस्ट रोजी विधानभवनाबाहेर सुभाष देशमुख यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन त्यांना वाचविले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील जे.जे. रुग्णाललयातील प्लास्टिक सर्जरी विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
तत्पूर्वी पोलिसांनी त्यांनी दिलेल्या जबाबात आपल्या नावावरील शेतजमीन भावाने हडपल्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, आत्मदहन करण्याच्या काही दिवस अधीच सुभाष देशमुख हे वाशी ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी गेल्याची माहिती आहे. नंतर आत्मदहनासारखे गंभीर पाऊल त्यांनी उचलले. सभागृहातही यावर चर्चा झाली. परिणामी, वाशीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.