उमरगा (जि. उस्मानाबाद) : कराळी पाटीजवळ तीन दिवसा पूर्वी झालेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेनंतर तलमोड ग्रामस्थांनी पोलिस वाहन व अग्नीशमन गाडीवर केलेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लोकांची धरपकड करताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दि.25 मध्यरात्री दोन वाजता झालेल्या प्रकारानंतर संतापलेल्या तलमोड ग्रामस्थांनी वृद्धाचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान पोलिसांची दडपशाही व मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात ठिय्या मांडला
याबाबतची माहिती अशी की, रविवारी ( दि. 21 ) दुपारी चारच्या सुमारास कराळी पाटीजवळ झालेल्या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेदरम्यान पोलिस प्रशासन व अग्नीशमन गाडी वेळेत पोहचली नसल्याने भावनेच्या भरात ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, अग्नीशमन गाडीचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तलमोडच्या 20 ते 25 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी गुरुवारी मध्यरात्री तलमोड गावात पोहचले.
मूकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे वय ६५ या वृध्दाने आमच्या पोरान काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वृध्दाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मध्यरात्रीपासूनच गावं जागी झाला आणि पोलिसाच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र आला. पहाटे पाचच्या सुमारास दत्तू मोरे यांचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातील कट्यावर ठेवला. पोलिसांच्या मारहाणीमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.
या प्रकरणात खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्यासह तलमोडचे बालाजी मोरे, राहुल मोरे, दगडू पाटील, मल्लीनाथ स्वामी, अमर पाटील, राजेंद्र सुगीरे, नाना पाटील, धनराज मोरे, विलास मोरे, संतराम पाटील, राजेंद्र येवते, राजेंद्र जाधव, दतू जाधव, पवन स्वामी, विजय मोरे, यादव भोसले, अशोक मोरे, सुधाकर मोरे,विजय मोरे आदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते.