पाथरूड (जि. धाराशिव) : पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासाेबतच पिकांचे तातडीने पंचनामे करून काेरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरीपुत्रांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत पाथरूड येथे हैदराबाद राज्य मार्ग राेखला. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदाेलनामुळे दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पावसाळा सरत आला असताना एकही दमदार पाऊस झालेला नाही. नदी-नाले अन् लहान - माेठे प्रकल्पही काेरडेठाक आहेत. पाण्याअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. काही वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पशुधनासाठी चाराही उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाेबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ‘आ’वासून उभा आहे. असे असतानाही शासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. २५ टक्के अग्रीमचाही पत्ता नाही. उपराेक्त चित्र पाहता, शासनाने तातडीने काेरडा दुष्काळ जाहीर करून उपाययाेजना राबविण्यास सुरुवात करणे आवश्यक असताना फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असल्याचे सांगत शुक्रवारी शेतकरीपुत्र रस्त्यावर उतरले. हैदराबाद राज्य मार्गावरील पाथरूड येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले. जवळपास तीन तास हे आंदाेलन चालले. आंदाेलनात सहभागी शेतकरीपुत्रांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आंदाेलनामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.
आंदाेलनस्थळी केले मुंडणशेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळावेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सरकार आणि प्रशासनही याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा आराेप करीत शेतकरीपुत्र संदीप खुणे याने आंदाेलनस्थळीच मुंडन केले. यावेळी जाेरदार घाेषणाबाजीही करण्यात आली.