लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आगाऊ पहिला हप्ता द्यावा किंवा गुत्तेदारामार्फत घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, येथील नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतून २९१ घरकुले मंजूर झाली आहेत. यातील १५० घरकुलांचे काम सुरु असून, केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय १४१ घरकुलांना मंजुरी असतानाही ही कामे सुरू करण्यात आली नसल्याची माहिती नगर पंचायतीकडून मिळाली आहे. नियमानुसार प्रथम बेसमेंट केल्यानंतर अनुदानाचा पहिला हप्ता शासनाकडून दिला जातो. परंतु, हे १४१ लाभार्थी गरीब व मोलमजुरी करणारी कुटुंब आहेत. यामुळे त्यांना हे काम चालू करणे शक्य नाही. त्यांना पहिला हप्ता आगाऊ द्यावा किंवा गुत्तेदारामार्फत बांधकाम करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गनायझेशनचे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब फकीर, हाजी अमिन सुबेकर, महेबूब कुरेशी, सादीक फकीर, जिंदाशा फकीर, आमिन कुरेशी, सलीम कुरेशी, बाबा कुरेशी, इकबाल कुरेशी, युसुफ कुरेशी, हमीद शेख, दत्तू हाक्केइरफान सय्यद, जाकेर कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.