तुळजापूर :श्री तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शन पास अभावी होणारी हेळसांड थांबवून जलदगतीने दर्शनाची सोय करावी, अशी मागणी शहरवासियांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष व व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सध्या लग्नसराई व यात्रा काळ असल्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. परंतु, दर्शनपासच्या नावाखाली भाविकांची हेळसांड होत आहे. मोफत दर्शन पास कार्डची संख्या कमी असल्यामुळे तेच पास भाविकांना स्टीकर लावून दहा ते बारा वेळेस दिले जात आहेत. यामुळे हे पास जीर्ण होऊन वारंवार त्याच पासला अनेक भाविकांचा स्पर्श होत असल्यामुळे सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे मोफत पासची संख्या वाढवून शहरातील दर्शन पास काउंटर पूर्ण क्षमतेने अतिरिक्त कर्मचारी नेमून चालवावेत, मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी मोफत पासचे वितरण पहाटे तीन वाजता सुरू करावे, भाविकांनी व लोकप्रतिनिधींनी दान केलेल्या सॅनिटायझर मास्कचा वापर मंदिरात व्हावा, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावर बाळासाहेब भोसले, शिवाजीराव बोधले, वेदकुमार पेंदे, विजय भोसले यांच्या सह्या आहेत.