भूम : शहराच्या मध्यभागी असणाऱ्या कन्या प्राथमिक शाळेच्या छतावर मोबाईल टॉवर उभा करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसोबतच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनादेखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे टॉवर हटविण्याची मागणी मयूर शाळू यांनी गटशिक्षण अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहरातील शाळू गल्लीतील हिरवा मारुती मंदिर परिसरात ही शाळा आहे. या शाळेच्या दुसऱ्या माळ्यावर एका मोबाईल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले आहे. मोबाईल रेंजमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हे टॉवर हटविणे गरजेचे असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शाळू यांच्यासह या भागातील इतर काही रहिवाशांच्या सह्या आहेत.