उस्मानाबाद : तुळजाभवानी क्रीडा संकुलावर स्क्वॅश रॅकेट्स हाॅलचे काम दर्जाहीन व निकृष्ट होत असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे संबंधितावर कारवाई करून हॉल चालू करण्याची मागणी जिल्हा स्क्वॅश रॅकेट्स संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील व सहसचिव कुलदीप सावंत यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे.
राज्य राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातील खेळाडू दर्जेदार व आधुनिक सुविधा नसताना देखील उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. यातच हॉलचे काम अर्धवट व दर्जाहीन होत असल्याने स्क्वॅश रॅकेट्स खेळाडूंना नेहमीच वंचित राहावे लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या स्क्वॅश रॅकेट्स हॉलचे काम चालू करून हॉल कार्यरत करण्याची मागणी जिल्हा स्क्वॅश रॅकेट्स संघटनेच्या वतीने करण्यात येत होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कार्यवाहीबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित कामाची निविदा काढली व ठेकेदारास काम करण्याचे आदेश देण्यात आले. हॉलमधील कामास प्रारंभ होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप काम पूर्णत्वास आले नाही.
त्यामुळे याकडे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतः लक्ष देऊन खेळाडूंना सरावासाठी हॉल चालू करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.