धाराशिव : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपायोजना कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वाशी तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतातील वाळलेल्या पिकांसह मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वाशी तालुक्याचा खंडवृष्टीत समावेश करावा, दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपाय योजना कराव्यात, पीक कर्ज माफ करावे, खरीप २०२४ चा पीक विमा मंजूर करावा, नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम तत्काळ द्यावी, अतिवृष्टी नुकसानाचे अनुदान राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे, २०२० चा सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा करावा, कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावी, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावोगावी बसविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुकाध्यक्ष वसंत जगताप, बिभीषण भैरट, तानाजी पाटील, गजानन भारती, मुकुंद शिंगणापुरे, शिवाजी उंद्रे, राजेश्वर कवडे, संजय कवडे, पांडुरंग घुले, बाळकृष्ण बारगजे, दादासाहेब चेडे, नाना उंद्रे, चंद्रकांत उंद्रे, चंद्रकांत चेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.यापूर्वी दोनदा दिले निवेदनेया सर्व मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनास यापूर्वी २४ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची शासनाने कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.