पूर्वी गावगाड्यात शेती कसण्यासाठी आवश्यक तेवढे मजूर मिळत होते. छोटे शेतकरी स्वतः मशागत करण्यावर भर देत असत. मोठ्या शेतकऱ्यांकडे हमखास सालगडी असायचे तर मध्यम शेतकरी गरजेनुसार हंगामी मजूर लाऊन शेती कामे उरकून घेत असत. काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ‘स्थित्यंतरे’ झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून काही गावात स्थलांतरे ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागवणाऱ्या कुटूंबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पीक पद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी सालगडी देता का? मजूर देता का मजूर? अशी आर्त विनवणी करण्याची नौबत शेतकऱ्यांवर आली आहे.
चौकट...
पाच वर्षापूर्वी मजुरी दर
स्त्री १२५, पुरूष २००
सध्या
स्त्री २५०, पुरूष ३५०
यंत्राने होणारी कामे
नांगरणी, मोगडनी, पाळी, पेरणी, काढणी, फवारणी अशी कामे यंत्राणे करण्यावर सध्या भर दिला जात आहे. असे असले तरी मशागत, काढणी, छाटणी, मळणी आधी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.
गरज ही शोधाची जननी
मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांना गरज असलेल्या व मजुराकरवी करून घेत जात असलेल्या कामासाठी नवतंत्राने अनेक यंत्र, सामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रक्टर्सचा व त्यावरील यांत्रिक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेर आता नामशेष होत असल्याचे दिसत आहे. कापूस वेचनीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहेत.
प्रतिक्रिया
शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे अडचणी येत आहेत. कापसाला वेचनीसाठी माणूस मिळत नाही, यात दरही वाढवला आहे. यामुळे यापुढे पिकच घ्यायचे टाळणार आहोत.
-राजाभाऊ गंभिरे
मजुराअभावी फवारणी, भाजीपाला काढणी, खुरपणी, खते देणे आदी कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अव्वाच्या सव्वा मागत आहेत. परंतु, शेतकऱ्याला पर्याय नाही. ऊस लावणं ६ हजार रूपये एकर सोयाबीन काढणी ४ हजार रूपये बॅग घेत आहेत.
-विनोद तांबारे, आंदोरा
शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडी ही मिळत नाहीत. यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्हातील मजूर आणले होते.
-तानाजी वाघमारे, भाटशिरपुरा