राज्यात सध्या शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. आता नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नामांतरापेक्षा त्या शहराचा विकास होणं महत्वाचं असल्याचं टोपे म्हणाले.
राजेश टोपे आज उस्मानाबादमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.
जनतेची इच्छा समजून घेऊ मग निर्णयशहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी तेथील जनतेची इच्छा समजून घेणं महत्वाचं असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीनं याबाबतचा निर्णय घेतला तर कोणतीही अडचण येणार नाही. मुळात नामांतराआधी त्या शहरातील जनतेची इच्छा समजून घेतली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज संजय राऊत यांच्या 'रोखठोक' या सदरातून काँग्रेसच्या सेक्यूलरवादावर जोरदार टीका करण्यात आली आहे. "औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत! हे वागणं सेक्यूलर नव्हे!", अशा शब्दांत 'रोखठोक'मधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.'रोखठोक'मधील या टीकेबाबत राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांना लिहू द्या, काही अडचण नाही, असं उत्तर टोपे यांनी दिलं.
नामांतराच्या वादावरुन सरकारमध्ये ठिणगीऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेकडून वारंवार औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जात असून महाविकास आघाडी सरकार याबाबतचा लवकरच प्रस्ताव आणणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. शहरांच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही. शहरांच्या नामांतराने तेथील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का? शहराचा विकास होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत थोरात यांनी याआधीच शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे.